 |
|
गणेशोत्सव 2007
लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाची मूर्ती सर्वत्र ``लालबागचा राजा'' म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव 2007 साठी तयारी जून 2007 पासूनच चालू झाली आहे. सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन सुलभरित्या व्हावे यासाठी मंडळाकडून विशेष व्यवस्था केली जात आहे. या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंडळ नेहमीच दक्ष असते. या उत्सवाच्या आयोजनामध्ये हातभार लावण्यासाठी सुमारे 1200 स्थानिक रहिवाश्यांनी `सहकारी सभासद' म्हणून आपली नोंदणी केली आहे. यातील काही निवडक सहकारी सभासदांना ``आपाद्कालीन व्यवस्थापनाचे'' प्रशिक्षण देण्यात येते.
श्री गणेश दर्शन व्यवस्था-
ज्या गणेशभक्तांना गणरायास आपले नवस बोलावयाचे अथवा फेडावयाचे असतील अशा गणेशभक्तांसाठी गणेशोत्सव 2006 प्रमाणेच व्यवस्था केलेली आहे. या गणेशभक्तांनी गणरायाच्या आवारात मागील बाजूने (नारायण उद्योग भवनकडून) प्रवेश करावा. येथे पोहचण्याकरीता चिंचपोकळी/भायखळा स्टेशनकडून येणाऱया भाविकांनी डॉ.आंबेडकर मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, ग.द.आंबेकर मार्ग व नंतर दिनशा पेटीट मार्ग (आंबेवाडी) तसेच करीरोड व लोअर परेल रेल्वे स्थानकातून (पूर्वेकडून) येणाऱया भाविकांनी साईबाबा पथ मार्गे ग.द.आंबेकर मार्ग व पुढे दिनशा पेटीट मार्ग या मार्गाचा वापर करावा.
ज्या गणेशभक्तांना लालबागच्या राजाचे `मुखदर्शन' घ्यावयाचे असेल त्यांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये या वर्षी बदल करण्यात आला आहे. अशा भाविकांना मुखदर्शनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान (गरमखाडा) येथून सोडण्यात येणार आहे. त्यासाठी मैदानामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
|
|