लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने! सध्या अस्तित्त्वात असलेली मंडई निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारीबंधुंनी नवस केला होता. तत्पूर्वी पेरुचाळ येथे उघड्या जागेवर बाजार भरत असे तो 1932 साली बंद करण्यात आला, म्हणून कायमस्वरुपी मंडई बांधण्याचे प्रयत्न त्या वेळचे नगरसेवक कै.कुवरजी जेठाभाई शाह, डॉ.व्ही.बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ.यु.ए.राव यांच्या नेतृत्वाखाली कोळी व व्यापाऱयांनी केला. त्यावेळी आपल्dया प्रयत्नांस यश लाभावे याकरिता कोळी महिला व व्यापारी बंधुंनी कार्य सिध्दीस नेणाऱया गणरायाला स्मरुण नवस केला की, `जर या मंडई उभारणीच्या कार्यात आम्हांस यश देऊन मंडई उभारली गेली तर या मंडईतच आम्ही तुझी स्थापना करू.' गणरायाच्या कृपा आशिर्वादाने त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले व जागा मालकाने आपली जागा मंडई बांधण्यास उपलब्ध करुन दिली. तद्नंतर सन 1932 ते सन 1934 या दोन वर्षातच आजची मंडई अस्तित्त्वात आली. त्याचवर्षी म्हणजे 12 सप्टेंबर 1934 साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात गणरायाची स्थापना करण्यात आली. गणराया नवसाला पावला म्हणून `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून `श्री'ची मूर्ती प्रसिध्द झाली.
!!
VAKRATUNDA MAHAKAYA SURYAKOTI SAMAPRABHA,
NIRVIGHNAM KURU ME DEVA SARVAKARYESHU SARVADA !! |
असे असले तरी तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले.
सन 1934 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस्.एम.मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्व निष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस.के. पाटील, गो.बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत.
सन 1942 हे साल महात्मा गांधीच्या चलेजाव चळवळीचे होते. या चळवळीत मंडळाचे कार्यकर्ते कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ.व्ही.बी. कोरगावकर, हाटले इ.नेत्यांची धरपकड करण्यात आली. त्याकाळात मंडळ गणरायाच्या मुर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. सन 1946 साली `श्री' ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. सन 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री'ची मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. 1948 साली महात्मा गांधी स्वर्गवासी झाले. तेव्हा गांधींजींची प्रतिकृती गजाननाच्या स्वरुपात दाखविण्यात आली. त्यामुळे मुंबई शहरात प्रचंड वादंग माजला होता.
सन 1946 साली जातीय दंगा झाला होता. त्यावेळी मंडळास गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर समस्या निर्माण झाली होती. शेवटी एकवीस दिवसानंतर गणरायाची विसर्जन मिरवणूक होती त्याच मार्गाने चौपाटीवर नेण्यात आली. त्यावेळी श्री.पांडुंग उर्फ बाबू सायले, कै.एम्.एस्.पवार व दत्ताराम जोशी यांनी स्वयंसेवक प्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. लोक अजूनही त्यांची आठवण काढतात.
सन 1947सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले मंडळाच्या शिलक़ी निधीतून कस्तूरबा फंड, 1948 साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, 1959 साली बिहार पूरग्रस्त निधीस, तसेच 1962 व 1965 च्या युध्दात मंडळाने राष्ट्रीय निधीस, आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच मंडळ `श्री'पुढील देखाव्यात देखील बदल करुन समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करु लागले.
सन 1958 साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे लोकांच्या अजूनही स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म.ल.पाटील, नामदार गणपतराव तपासे, नामदार गोविंदराव आदिक, नामदार मालोजी निंबाळकर, म्युनिसिपल कार्पोरेटर डॉ. नरवणे नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री.गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली.
सन 1958सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत गेली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. दर्शनाची व्यवस्था चोख ठेवण्यासाठी 1960 सालानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम व व्याख्याने बंद करण्यात आले. त्याच वर्षी लोकाग्रहास्तव नवरात्रौत्सवाची स्थापना करण्यात येऊन मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात येऊ लागले. सर्वश्री चंद्रकांत खाडये, चुनिलाल राठोड, प्राणजीवन मेहता, शंकर मोरे यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. सन 1948 ते 1968 या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायात चालू आहे. तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पध्दत सुरु केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकन रोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल शंका नाही.
सन 1934 ते 1968 या काळात कुवरजी जे.शहा, डॉ.व्ही.बी.कोरगांवकर, एच्.बी. कोरगावकर, डॉ.यु.ए. राव, डॉ.मंजु मदार, रामचंद्र तवटे, बी.डी. बांदेकर रघुनाथ खामकर, प्राणजीवन मेहता, रामबली हलवाई, राम जाधव या प्रभुतींनी प्रामुख्याने मंडळाची धुरा सांभाळली.
सन 1969 साली कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्माण झाली. कै. वसंतराव भोसले यांचे दमदार नेतृत्व मंडळाला लाभले. त्यांना ऍड.नागेश पवार सर्वश्री काशिराम सि.महाडिक, मदन कडू, दत्ताराम दळवी, सखाराम आंबे, रमेश चव्हाण, सिताराम साळवी, चंद्रकांत खाडये, जयप्रकाश कोरगांवकर यांची साथ लाभली. त्यांच्याच नेतृत्वाखाली मंडळाने नव्या कार्याची उभारणी केली. मंडळाचा कार्यव्याप वाढत चालला होता. त्याकरीता स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. सन 1970 साली हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार करावा असे ठरले. 1971 साली जिर्णोध्दारास सुरुवात होऊन 1973 साली मंदीर नवीन स्वरुपात बांधले गेले व तेथेच एका सुबक कार्यालयाची देखील निर्मिती केली गेली. 1975 साली भवानी मातेची मंदीरात कायमस्वरुपी स्थापना करुन त्याच ठकाणी नवरात्रौत्सव साजरा करण्यात येऊ लागला. 1976 सालापासून मंडळाचा शिलकी निधी शिक्षण इमारत निधी नावाने जमा करण्यास येऊन शालेय इमारत उभी करण्याची प्रचंड महत्वाकांक्षा मंडळाने उरी बाळगली शिक्षण प्रसाराचे उदात कार्य हाती घेतले. मंडळ समृध्द झाले.
सन 1982 सालापासून श्री.रमेश चव्हाण याच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेस पुनश्च प्रारंभ झाला. तसेच वाचनालय सुरु करण्यात आले. सन 1983 साली मंडळाने 50 वर्षे पूर्ण केली. यावेळी मंडळाने सात घोड्यांच्या रथात बसलेली. सुर्यनारायणरुपी गणेशमुर्तीची स्थापना केली होती.तसेच मागील एकोणपन्नास वर्षात झालेल्या गणेशोत्सवातील देखाव्यांचे हुबेहुब प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन भाविकांचे आकर्षण झाले होते. सुवर्णमहोत्सवी वर्षांचे अध्यक्षपद श्री.चंद्रकांत खाडये यांनी भुषविले होते तर सरचिटणीस व खजिनदार म्हणन कै.वसंतराव भोसले व श्री.मारुती तळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. पानसुपारी समारंभात सुवर्ण महोत्सवानिमित्त माजी कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुवर्ण महोत्सव साजरा करण्याकरीता सर्वश्री किरण नाबर, कै.दिलीप नाईक यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
सन 1984पासून पुन्हा एकदा नवीन पिढीने मंडळाचा कार्यभार हाती घेऊन मागील पिढीने सुरु केलेले कार्य जोमाने पुढे चालू ठेवले. त्यात सर्वश्री रमेश चव्हाण, अशोक पवार, सुभाष सायले, रमेश बोधे, सुर्यकांत मांडवकर, मनोहर पवार, सिताराम नकाशे यांचा सिंहाचा वाटा होता.1984 साली नवरात्रौत्सव रौप्य महोत्सव दिमाखात साजरा केला. सन 1984 ते 1993 या दशकात अनेक विधायक कामे केली. कोकण पूरग्रस्त निधीस पंधरा हजार रुपयांची देणगी दिली.
पाऊस कितीही पडला तरी शेतकऱयाच्या घामाचे थेंब शेतात पडल्याशिवाय पीक येत नाही त्याचप्रमाणे पैशाचा कितीही पाऊस पडला तरी कार्यकर्त्यांच्या कष्टाशिवाय मंडळाचा विकास होत नाही. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक कामकाजाला आणि कुटुंबातला वेळ खर्च करुन विनामोबदला मंडळासाठी काम करुन वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार विभागातील रहिवाशी, व्यापारी आणि समस्त भाविकाच्या सहकार्याने गेली 73 वर्षे मंडळाचा नंदादीप सातत्याने तेवत ठेवला आहे. आणि यापुढे देखील हा नंदादीप असाच तेवत ठेवू याची मंडळ खात्री देत आहे.